जळगाव मिरर | १ नोव्हेबर २०२३
येत्या काही दिवसावर दिवाळीचा सण आला असतांना सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी देखील समोर आली आहे. गेल्या काही वर्षापासून देशात महागाईच्या झळा सोसत असलेल्या सामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. तेल वितरण कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल 101.50 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून ही वाढ करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा गॅसचे दर वाढवले आहेत. व्यावसायिक गॅस 101.50 रुपयांनी महागला आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 902.5 रुपये आहे. तर दिल्लीत घरगुती सिलिंडर 903 रुपये, पश्चिम बंगाल 929 रुपये, तर चेन्नईत घरगुती गॅस सिलिंडर 918.5 रुपयांना विकला जात आहे.
गेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेलाही तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. 1 ऑक्टोबरपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 209 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरला 1731.50 रुपयांनी विकला जात होता.