जळगाव मिरर | १४ मे २०२५
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना आता पाचोरा येथे भडगाव रोडवरील हॉटेल भाग्यलक्ष्मी गार्डनजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला बोलेरो कारने मागुन जोरदार धडक दिल्याने बोलेरो मधील चालक व त्यांची पत्नी जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना कारच्या बाहेर काढून उपचारासाठी हलवले. या जखमींवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा ते भडगाव रस्त्यावर हॉटेल भाग्यलक्ष्मी गार्डन जवळ एक ट्रॅक्टर बंद स्थितीत असल्याने रस्त्याच्या कडेला उभे होते. दरम्यान मंगळवारी सायंकाळी ७. ३० वाजेच्या सुमारास पाचोऱ्याहुन भडगावच्या दिशेने जाणारी चारचाकी बोलेरो कार क्र. एमएच १९ बीई ७०८० ने या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत बोलेरोचे चालक विजय रामकृष्ण वाणी (वय ७०) व त्यांच्या पत्नी लताबाई विजय वाणी (वय ६५) हे वृद्ध दाम्पत्य जखमी झाले. जखमींना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.




















