
जळगाव मिरर | २ मे २०२५
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना आता नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. भरधाव पिकअप वाहनाने चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने 23 वर्षीय जयश्री सोनवणे या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा भाऊ सुमित सोनवणे आणि अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर दारूच्या नशेत वाहन चालवल्याचा संशय आहे.
जयश्री सोनवणे आणि तिचा भाऊ सुमित हे दुचाकीवरून प्रवास करत होते. मागून भरधाव वेगात आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेने दोघेही रस्त्यावर फेकले गेले. जयश्री गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुमितलाही गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर पिकअपने थांबण्याऐवजी पुढे धावत आणखी दोन दुचाकी आणि एका चारचाकी वाहनाला धडक दिली, ज्यामुळे दोन तरुण जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या सुमित आणि अन्य दोन जखमींवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे, मात्र सर्वांनाच मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत चालकाने दावा केला की, त्याच्या मांडीवर बसलेल्या मुलाने चुकून अॅक्सेलेरेटर दाबल्याने गाडीचा वेग वाढला आणि अपघात झाला. मात्र, प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे की, चालक दारूच्या नशेत होता. यामुळे अपघाताला त्याची बेफिकीर वृत्ती कारणीभूत असल्याचा संशय आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चालकाच्या रक्ताची तपासणी केली जात आहे. जयश्रीच्या अकाली मृत्यूने तिच्या कुटुंबावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. भावासमोरच बहिणीने प्राण सोडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
–





















