जळगाव मिरर | १८ नोव्हेंबर २०२६
आजीकडे राहत असलेल्या ६ वर्षीय बालिकेवर तिच्या चुलत मामानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ५ वर्षानंतर उघडकीस आली आहे. हा प्रकार सन २०२१ ते २०२४ दरम्यान रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात घडला. या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या चुलत मामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथे खासगी नोकरीला असलेल्या एका महिलेची ६ वर्षीय मुलगी जळगावातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात राहणाऱ्या आजीकडे राहत होती. त्या बालिकेचा चुलत मामा याठिकाणी आजीकडे येत होता. जानेवारी २०२१ ते २०२४ या दरम्यान सदर बालिका घरी एकटीच असताना चुलत मामाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर ही बालिका पुणे येथे आईकडे गेली तेव्हा तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्या वेळी तिच्या आईने दि. १६ नोव्हेंबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पीडित मुलीच्या चुलत मामाविरुद्ध पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात येऊन न्यायालयात हजर केले असता दि. २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.




















