जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२५
भरधाव वेगाने बुलेटवरुन जाणाऱ्या विद्यार्थ्याने समोरुन येणाऱ्या भरधाव कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, बुलेटस्वार तरुण हा बुलेटसह शेजारी असलेल्या गटारीत जावून पडला. ही घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सेंट जोसेफ शाळेजवळील शिवराम नगरात घडली. यामध्ये बुलेटस्वार किरकोळ जखमी झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील महाविद्यालयीन तरुण भरधाव वेगाने दुचाकी चालवित असल्याने अनेक अपघाताच्या घटना घडत आहे. हे अपघात रोखण्यासाठी शहर वाहतुक विभागाकडून दुचाकी चालविणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांवर कारवाईची मोहीम राबवून दुचाकी जप्त करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील ओंकारेश्वर मंदिराकडून (एमएच १९, ईडी ९९२९) क्रमांकाचा बुलेटस्वार विद्यार्थी भरधाव वेगाने जात होता. यावेळी समोरुन येत असलेल्या (एमएच १९, ईजी १५५८) क्रमांकाच्या कारची आणि बुलेटची समोरासमोर धडक होवून अपघात झाला.
बुलेटने दिलेली धडक इतकी जोरात होती की, कारच्या पुढील भाग तुटून गेला होता. तर कारमधील एअरबॅग उघडल्यामुळे कार चालक बालंबाल बचावला. तर दुसरीकडे बुलेटस्वार तरुण हा बुलेटसह थेट शेजारी असलेल्या गटारीत पडून जखमी झाला. अपघात झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गटारीत पडलेल्या बुलेटस्वार तरुणाला बाहेर काढले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्यात आलेली नव्हती.