
जळगाव मिरर | ३१ मे २०२६
शहरातील ममुराबाद रस्त्यावर असलेल्या म्हाळसा देवी मंदिरात चोरट्याने हातसफाई केली. मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्याने सुमारे २० ते २५ हजार रुपयांची चिल्लर चोरुन नेली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. चोरी करतांना एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ते फुटेज पोलिसांनी जप्त केले असून चोरट्याचा शोध सुरु आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ममुराबाद रस्त्यावरील शेतात म्हाळसादेवीचे मंदिर असून त्याठिकाणी जोशी नामक व्यक्ती पुजारी म्हणून देखभाल करतात. शुक्रवार दि. २९ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून तो आत शिरला. त्याने मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेली लोखंडी पेटीचे कुलूप तोडून सामान अस्ताव्यस्त फेकला, मात्र त्याला काहीही मिळून न आले नाही. त्यानंतर संशयित चोरट्याने हातात आणलेल्या लोखंडी पट्टीच्या सहाय्याने मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडले. त्यामध्ये असलेली रोकड पिशवीत भरुन चोरटा तेथून पसार झाला.
मंदिरात शिरल्यापासून ते दानपेटी फोडून रोकड लंपास करण्यापर्यंतची संपुर्ण घटना मंदिरातील गाभाऱ्या लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ते सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या फुटेजमध्ये एक चोरटा चोरी करतांना स्पष्टपणे त्याचा चेहरा दिसत असल्याने तो परप्रांतीय असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोनि शशिकांत पाटील, पोहेकॉ प्रकाश चिंचोरे व सोपान पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी डॉग स्कॉडसह ठसे तज्ज्ञांच्या पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. त्यांनी घटनास्थळावरुन काही पुरावे गोळा केले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरालगत असलेल्या याच मंदिरात गेल्या दोन वर्षांपुर्वी चोरी झाली होती. त्यावेळेस देखील चोरट्यांनी दानपेटीतील रोकड चोरुन नेली होती. त्यानंतर मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. परंतू कॅमेरे असतांना दखील पुन्हा चोरी होवून दानपेटीतील रक्कम चोरुन नेल्याचे उघड झाले आहे.





















