जळगाव मिरर | २८ नोव्हेबर २०२४
भुसावळ तालुक्यातील साकेगाव जवळीक असलेल्या वांजोळा रोड फाट्याजवळ असलेल्या टेन्ट हाऊसच्या गोदामाला अचानक भीषण आग लागल्याने गोदामामधील डीजे, मंडप आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाल्याची घटना २७ नोव्हेंबरला सायंकाळी घडली. दरम्यान, ही आग विझवण्यासाठी भुसावळ नगरपालिकेचा अग्निशमन बंब दाखल झाला असून आग विझवण्याचे काम सुरू होते. या घटनेबाबत पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहराबाहेरील जळगावकडे जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहाच्या कडेला राजस्थान मार्बलजवळ कुशल राणे फटाकेवाले यांचे मंडप व्यवसायाचे साहित्याचे मोठे गोदाम आहे. या गोदामाला २७ रोजी ५ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत लाखों रूपयांचे मंडपाचे साहित्य जळून खाक झाले आहे. भुसावळ नगर परीषद व वरणगाव आयुध निर्माणीच्या अग्नीशमन यंत्रणेने ही लागलेली आग आटोक्यात आणण्याकरीता शर्थीचे प्रयत्न केले. तर ४ ते ५ अग्निशमन बंबांच्या गाड्यांवरील कर्मचाऱ्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न ांची पराकाष्ठा केली.