जळगाव मिरर | संदीप महाले
जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी तसेच विरोधक अशा दोन्ही बाजूंना नागरिकांच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. मागील निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यामुळे, काही अपवाद वगळता बहुतांश प्रभागांमध्ये माजी नगरसेवकांविषयी असंतोषाची भावना पसरलेली आहे.
नागरिक उघडपणे नाराजी व्यक्त करत नसले तरी, त्यांच्या मनातील रोष राजकीय पक्षांना जाणवत असून त्याचा परिणाम उमेदवार निवडीवर होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर बहुतांश पक्षांनी विद्यमान नगरसेवकांवर थेट विसंबून न राहता, दुसऱ्या फळीतील किंवा नागरिकांमध्ये फारसा विरोध नसलेल्या नव्या उमेदवारांचा शोध सुरू केला आहे.
अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यातच उमेदवारी निश्चित करून ‘एबी फॉर्म’ देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतला जाण्याची शक्यता असून, त्यामुळे शेवटच्या दिवसांपर्यंत उमेदवारांची नावे गुप्त ठेवण्याचे धोरण अवलंबले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे या निवडणुकीत अत्यंत सूक्ष्म व रणनीतीपूर्ण नियोजन केले जात असल्याचे स्पष्ट होते.
शहरातील काही भागांमध्ये नगरसेवकांनी ठेकेदारांची भूमिका घेतल्याने काही विकासकामे झाली असली तरी, त्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शासनाकडून प्राप्त झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी अपेक्षित दर्जाच्या कामांवर खर्च झाला नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. परिणामी, अशा नगरसेवकांना यंदाच्या निवडणुकीत मतदारांचा रोष सहन करावा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, काही इच्छुक उमेदवारांकडून आर्थिक ताकदीच्या जोरावर उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षांतर्गत स्पर्धा, नाराजी आणि नव्या उमेदवारांची चाचपणी यामुळे जळगावचे राजकीय वातावरण अधिकच रंगतदार बनले आहे.




















