जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२५
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडीट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगत प्रणेश प्रकाश ठाकूर (वय ३४, रा. शिवधाम मंदिराजवळ) या नोकरदार तरुणाला १ लाख ३२ हजारात गंडविले. या घटनेत विशेष म्हणजे, फिर्यादीने आरोपीला कोणतीही माहिती दिली नसतानाही ही फसवणूक झाली याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील निमखेडी रोड, शिवधाम मंदिर परिसरात राहणारे प्रणेश प्रकाश ठाकुर (वय ३४) यांना एका अनोळखी क्रमांकावरुन अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. कॉल करणाऱ्याने आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रणेश ठाकूर यांच्याकडे त्यांच्या क्रेडिट कार्डासंबंधी काही माहिती विचारण्याचा प्रयत्न केला. प्रणेश ठाकुर यांनी आपली कोणतीही गोपनीय माहिती त्या व्यक्तीला दिली नाही. असे असतानाही, संशयिताने क्रेडिट कार्डमधून १ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार ठाकूर यांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.