जळगाव मिरर | ६ ऑक्टोबर २०२३
यावल तालुक्यातील नायगाव ते किनगाव दरम्यान दुचाकी व ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागेवरच दुदैवी मृत्यू झाला असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नायगाव येथील राहणारे परशुराम प्रभाकर कोळी ( वय ३७) हे दुचाकी (एमएच १९, यू- ८६४ ) ने किनगावकडे जात असताना नायगाव शिवारात किनगाव रस्त्यावरील शेताजवळ ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास ट्रक (एमएच- १७, बिडी – ००८०) यांच्यात झालेल्या भुषण अपघातात परशुराम कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत त्यांचे चुलत बंधू चंद्रभान सुधाकर कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ट्रक चालक इम्रान खान रसुल (रा. साकळी, ता. यावल) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी ट्रक व अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेतली आहे. यावलच्या ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी मृत परशुराम कोळी यांचे शवविच्छेदन केले आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार असलम शेख करत आहेत.