जळगाव मिरर | ४ ऑक्टोबर २०२३
राज्यातील अनेक तरुणांचे लग्नाचे वय निघून जात असतांना या तरुणांना कुणीही मुली देत नसल्याचे अनेक घटनेमधून समोर आले आहे. त्याचे कारण देखील तसेच काही आहे. मुलांकडे नोकरी, घर व शेती अशा गोष्टी नसल्याने अनेक तरुण हतबल झाले आहे. काही दिवसाआधी तर तरुणांनी आंदोलन देखील केले होते. आता यात आणखी एक भर पडली आहे. घर नसल्याने मुलगी मिळत नाही अशी अनेक तरुणांची बोंब आहे. त्यामुळे “घरकुल द्या किंवा बायको द्या” अशी अजब मागणी बुलढाण्यातील एका तरुणाने केलीये.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्याच्या संग्रामपुर तालुक्यातील कोद्री या गावांमध्ये घरकुल योजनेची अंमलबजावणी अतिशय संथ गतीने सुरू आहे. अंकुश कड या तरुणाला घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी विलंब होत आहे. पर्यायाने पक्क्या घराअभावी त्याचं लग्न होत नाहीये. त्यामुळे एक तर घरकुल द्या किंवा बायको द्या अशी अजब मागणी अंकुश कड या अविवाहित तरुणाने संग्रामपूर गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. पाच वर्षात केवळ पाच लाभार्थ्यांना घरकुल मिळाले. घरकुल यादीत माझा 35 वा नंबर आहे. माझे वय 30 आहे.
दरवर्षी एक घरकुल तर 35 वा नंबर येईल तेव्हा मी म्हातारा होईल. मग घरकुल मिळून काय फायदा असा प्रश्न युवकाने उपस्थित केला आहे. घर नसल्याने कोणी मुलगी देत नाही. या आशयाचे निवेदन संग्रामपूर गट विकास अधिकाऱ्याकडे करण्यात आले आहे. तरुणाने केलेल्या या मागणीमुळे संपूर्ण वागात त्याची चर्चा सुरू आहे. तरुणांची होत असलेली अडचण लक्षात घेता घरकुलाची मागणी पूर्ण होणार का? हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.