जळगाव मिरर । १५ ऑक्टोबर २०२५
जुन्या राष्ट्रीय महामार्गावरून घरी परत येत असताना शिक्षिकेला येणाऱ्या कारने भरधाव वेगाने धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि. १४ रोजी सायंकाळी घडली. भावना प्रशांत मुळे (५३, श्रीनाथजीनगर, पारोळा) असे त्यांचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, भावना या पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील जि.प. शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्या सायंकाळी ५ वाजता शाळेचे कामकाज संपवून घरी परत येत होत्या. जुन्या महामार्गापासून काही अंतरावर त्या दुचाकीवरून (एमएच-१९/बीटी०५७२) येत होत्या, तेव्हा रस्त्याचे काम सुरू होते. अचानक समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (जीजे२६/एके१७५०) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही कार समाधान दिगंबर पाटील (अंतुर्ली, ता. पाचोरा) हा चालवत होता. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलिस ठाण्यात झाली नव्हती.
भावना मुळे याआधी भोकरबारी (पारोळा) येथे कार्यरत होत्या. मात्र, गेल्या महिन्यात त्यांची म्हसवे येथील जि.प. शाळेत बदली करण्यात आली होती. त्यांचे पती प्रशांत मुळे हेदेखील शिक्षक होते. पाच वर्षापूर्वी प्रशांत यांचे निधन झाले होते. त्यानंतर आजी-आजोबांचादेखील मृत्यू झाला. त्यांना एक डॉक्टर मुलगा आहे. तो सध्या पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.