जळगाव मिरर | १८ ऑक्टोबर २०२३
अनेक जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना ताजी आहे तर या घटनेत अनेक पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात देखील घेतले आहे. अशातच मुंबई शहरातील ठाण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धावत्या लोकल ट्रेनमधून १७ वर्षीय तरुणीचं अपहरण झाले असून याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तरुणीची सुटका देखील केली असून आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबरला १७ वर्षीय तरुणी बदलापूर ते विक्रोळी लोकल ट्रेनने प्रवास करीत असतांना प्रवासात असताना तिने घरी फोन देखील केला. मात्र, उशीर होऊन सुद्धा ती घरी पोहचली नाही. तसेच तिचा फोन देखील लागत नव्हता. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबियांना चिंता लागली. त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. आपल्या मुलीचे अपहरण झाले असावे, अशी शंका देखील मुलीच्या आई-वडिलांनी व्यक्त केली.
दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत तरुणीचा शोध सुरू केला. पोलिसांनी संशयित तरुणाचं मोबाईल लोकेशन चेक केलं असता, ते २५० किमी दूर साताऱ्यात असल्याचं कळाली. त्यानंतर पोलिसांचं एक पथक तातडीने साताऱ्याला रवाना झालं. तिथे गेल्यानंतर पोलीस तरुणाच्या गावात धडकले. दरम्यान, पोलिसांना तिथे १७ वर्षीय तरुणी दिसून आली.
किशोर (वय १९ वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचं नाव आहे. किशोरने माझे लोकल ट्रेनमधून अपहरण केले आणि मला साताऱ्यात आणले, असा जबाब तरुणीने पोलिसांना दिला. तर तरुणी स्वत:हून माझ्यासोबत आली असून मी तिचे अपहरण केले नाही, असा दावा किशोर याने केला आहे. पोलिसांनी या दोघांच्या मित्रांची चौकशी केली तर मुलगा-मुलगी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे कळाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.