जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२५
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बससेवेतील विविध समस्या आणि अनियमिततेमुळे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर जळगाव येथील आगार व्यवस्थापकांना निवेदन देत तीव्र भूमिका घेतली आहे.
जळगाव शहर हे जिल्ह्याभरातील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रमुख केंद्रस्थान असल्याने, ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी दररोज शैक्षणिक कामांसाठी ‘लालपरी’ने प्रवास करतात. विद्यार्थ्यांसाठी शासनाची बससेवा आर्थिक व सुरक्षित बाबींनुसार फायद्यात्म्क असल्याने ते तिचा वापर करतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या परिवहनात गंभीर समस्या जाणवत आहेत. यामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे वेळापत्रकानुसार बस उपलब्ध होत नाहीत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचायला उशीर होतो आणि पर्यायाने त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. यावर उपाय म्हणून, बस सर्व ग्रामीण भागातील थांब्यावर वेळेवर उपलब्ध व्हाव्यात अशी ‘अभाविप’ची मागणी आहे.
याव्यतिरिक्त, बसमधील काही वाहक विद्यार्थ्यांशी गैरवागणूक करत असल्याचे आढळून आले आहे. अशा वाहकांवर योग्य पुरावा मिळताच दंडात्मक कारवाई करण्याची मागणी परिषदेने केली आहे. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन आणि कोर्ट चौक या प्रमुख थांब्यांवर मोठ्या संख्येने विद्यार्थी चढ-उतार करतात. त्यामुळे जळगाव आगारातून यावल-चोपडा आणि धरणगाव-एरंडोल मार्गे जाणाऱ्या बसेस या थांब्यावर थांबल्याच पाहिजेत, अशी स्पष्ट मागणी परिषदेने केली आहे.
पासधारक विद्यार्थ्यांना पासच्या नूतनीकरणासाठी आगारामध्ये भल्या मोठ्या रांगेत तासन्तास उभे राहावे लागत आहे, ही आणखी एक गंभीर समस्या आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
यावेळी अभावीपचे महानगर मंत्री चिन्मय महाजन यांनी आगार व्यवस्थापकांना विनंती केली आहे की, या सर्व समस्यांवर त्यांनी लवकरात लवकर उपाययोजना करावी. अन्यथा, विद्यार्थी परिषदेच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागेल.




















