जळगाव मिरर | २७ नोव्हेंबर २०२५
मालेगाव येथे चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचारप्रकरणाने संतापाची लाट उसळली असून, या भीषण घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे जोरदार निषेध नोंदवला. अभाविपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांसह विद्यापीठातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी एकत्र येत या घृणास्पद कृत्याचा कठोर शब्दांत निषेध नोंदवत समाजात जागृतीचा संदेश दिला.
विद्यार्थ्यांनी एकमुखीपणे दोषींना कठोरात कठोर शिक्षा देऊन पीडित बालिकेला न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी केली. यावेळी उपस्थितांनी अशा प्रकारच्या अत्याचारांना समाजातून मूळच्छेद करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. निषेध सभा घेताना विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांचा मोठा जमाव जमला होता. यामध्ये अभाविपचे विद्यापीठ अध्यक्ष पवन सोनवणे, उपाध्यक्ष अंकुश सर्वेकर, अमोल पाटील, तसेच अभाविपचे सर्व विद्यार्थी कार्यकर्ते आणि अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निषेध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी समाजात महिला व बालिकांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला.





















