
जळगाव मिरर | २४ जुलै २०२५
जळगाव एसीबीने काल दि.२३ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात २ हजारांची लाच घेताना अधिकारी अटकेत असल्याची घटना ताजी असतांना आता जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागातील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती माधुरी सुनिल भागवत (वय ३८) यांना ५,००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार गुरुवारी (२४ जुलै २०२५) जळगाव येथे घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणातील तक्रारदार हे शासकीय दिव्यांग समिश्र केंद्र, जळगाव येथे भौतिक उपचार तज्ञ तसेच प्रभारी अधीक्षक (वर्ग २) पदावर कार्यरत आहेत. दि. १४ जुलै रोजी त्यांनी पगार बिलासंदर्भात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयात भेट दिली असता, श्रीमती भागवत यांनी जून महिन्याचे पगार बिल मंजूर करून पुढे पाठवण्यासाठी १२,००० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक २२ जुलै २०२५ रोजी लाचलुचपत विभाग जळगाव येथे लेखी तक्रार दाखल केली. प्राथमिक पडताळणीअंती लाच मागणीची खात्री पटली. त्यानंतर पथकाने सापळा रचत दिनांक २४ जुलै रोजी माधुरी भागवत यांना तक्रारदाराकडून ५,००० रुपये पहिला हफ्ता स्वीकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. पडताळणीदरम्यान आरोपीने १०,००० रुपये लाच मागणी केली होती. तडजोडीनंतर पहिल्या हप्त्यात ५,००० रुपये घेऊन उर्वरित रक्कम इतर बिले मंजूर झाल्यावर घेण्याची मागणी केली होती. सध्या जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडून सुरू आहे.
यांनी केली कारवाई
पोलिस उपअधिक्षक श्री.योगेश ठाकूर, सापळा व तपास अधिकारी पोलिस निरीक्षक श्री.हेमंत नागरे, सापळा पथक सुरेश पाटील (चालक), पोहेकाँ/ श्रीमती शैला धनगर.पोकाँ/ प्रणेश ठाकूर.पोकाँ/ सचिन चाटे




















