
जळगाव मिरर | २७ सप्टेंबर २०२५
टेंभूर्णी-सोलापूर बायपास मार्गावरील खड्ड्यांमुळे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाहन ताफ्याला शुक्रवारी मनस्ताप सहन करावा लागला. त्यांच्या गाडीचे दोन्ही टायर अचानक फुटल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र, चालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला.
त्यानंतर काही अंतरावर ताफ्यातील आणखी दोन वाहनांचे टायर फुटण्याच्या घटना घडल्याने खड्ड्यांचे गांभीर्य अधोरेखित झाले. या घटनांमुळे उपसभापतींसह संपूर्ण ताफ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
या धक्कादायक प्रकारानंतर डाॅ. गोऱ्हे यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश दिले. “या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये, यासाठी त्वरीत कारवाई करणे आवश्यक आहे,” असे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, उपसभापती कार्यालयाचे स्वीय सहाय्यक योगेश जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनांमध्ये डॉ. गोऱ्हे यांच्यासह सर्वजण सुखरूप आहेत.




















