जळगाव मिरर | २८ नोव्हेबर २०२४
भडगाव तालुक्यातील कजगाव येथील येथील रहिवाशी बापू सोमनाथ जगताप (वय ५७) हे नगरदेवळा येथे लग्न समारंभासाठी जात असताना झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील न्यू जगताप मेन्स पार्लरचे संचालक बापू सोमनाथ जगताप हे दुचाकीने व त्यांचे दोन चिरंजीव मुन्ना जगताप व विकी जगताप हे दुसऱ्या दुचाकीने २६ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास नगरदेवळा येथे आयोजित नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी जात होते. दरम्यान, कजगाव ते भडगाव मार्गावरील साईबाबा मंदिराच्या पुढे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह दोन ट्रॉली (जुगाड) हे अर्धवट रस्त्यात म्हणजे एक ट्रॉली रस्त्यावर एक ट्रॉली साईड पट्टीवर ता ट्रॅक्टर खड्ड्यात अशा पद्धतीने उभो होते. या ट्रॅक्टरमुळे तसेच समोरून पडणाऱ्या वाहनाच्या लख्ख प्रकाशामुळे ट्रॅक्टर दिसले नाही.
या ट्रॅक्टरला इंडिकेटर अथवा रेडियम नसल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली न दिसल्याने बापू जगताप यांची दुचाकी सरळ ट्रॅक्टर ट्रॉलीवर जाऊन आदळल्याने जगताप हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, काही अंतरावर असलेले त्यांची दोन्ही मुले तेथे पोहचल्यानंतर त्यांना वडिलांचा अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका मागवून जगताप यांना उपचारासाठी चाळीसगाव येथे हलवले. मात्र, रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, २७ रोजी दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत जगताप यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुले, सुना असा परिवार आहे.