जळगाव मिरर | १९ नोव्हेबर २०२४
रावेर ते मोरगाव खुर्द रस्त्याने १८ रोजी गस्त घालताना अवैध लाकडांची वाहतूक करणारा ट्रक वन विभागाने ताब्यात घेतला आहे. या कारवाईत जवळपास अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करुन वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कंपनीचा ट्रक (एमएच ०४, सीयू – ५४१८) मध्ये अवैध लाकूड भरलेले असल्याचे वन विभागाच्या पथकाला गस्त घालत असताना दिसून आले या प्रकरणाची चौकशी केली असता वाहन चालकाकडे लाकूड वाहतूक परवाना नसल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी मुद्देमालासह वाहन चौकशीसाठी ताब्यात घेऊन या प्रकरणात शेख लुकमान शेख बशीर (वय ४१, रा. रावेर) यास ताब्यात घेण्यात आले आहे. तर हा मुद्देमाल रावेर येथील शासकीय मुख्य अगार डेपोत जमा केला. यात १५ हजार ५०० घ.मी. जवळपास २१ हजार ५०० रुपयांचे जळाऊ लाकूड, तसेच अंदाजे २ लाख ३० हजारांचा टाटा कंपनीचा ट्रक असा एकूण २ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय वन अधिनियमानुसार शेख लुकमान शेख बशीर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकराचा तपास वनपाल सुपडू सपकाळे करत आहेत. ही कारवाई वनसंरक्षक नीनू सोमराज, उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वन संरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, वनरक्षक सूपडू सपकाळे, जगदीश जगदाळे, थावऱ्या बरेला, कियारसिंग बारेला, आकाश बारेला, नीलेश बारेला व वाहन चालक विनोद पाटील यांनी केली.