जळगाव मिरर | १३ फेब्रुवारी २०२५
राज्यातील ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा जोर धरत असतांना आता आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जावून आपल्या खासदारांची भेट घेतली आहे. शिंदे गटाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला ठाकरे गटाच्या 3 खासदारांनी हजेरी लावली होती. राजकीय वर्तुळात ऑपरेश टायगरच्या चर्चा सुरू असताना ठाकरे गटाच्या खासदारांनी शिंदेंच्या मंत्र्यांच्या घरी जेवणासाठी उपस्थिती दर्शवल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांनी आपल्या खासदारांना सूचना केल्या आहेत. सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांच्या स्नेहभोजनाला जाण्याआधी पक्षाची परवानगी घ्यावी, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी खासदारांना केल्या आहेत. आदित्य ठाकरेंच्या सूचनांमुळे ठाकरे गटातील खासदार नाराज झाल्याची चर्चा सुरू आहे.
ऑपरेशन टायगरला वेग आला असल्याची चर्चा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे सध्या दिल्लीत आहेत. आज सकाळी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी आपल्या खासदारांशी संवाद साधला. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी स्नेह भोजनाला बोलावले तर पक्षातील वरिष्ठांना विचारल्याशिवाय जाऊ नका, अशी तंबी आदित्य ठाकरे यांनी खासदारांना दिली. त्यामुळे खासदारांना आता कोणत्याही सत्ताधारी पक्षातील नेत्याकडे जायचे असल्यास त्यासाठी पक्षाची परवानगी आवश्यक असेल. दरम्यान, मंत्र्यांनी बोलावल्यानंतर जायला हवे, असे सांगत ठाकरे गटाच्या संबंधित खासदारांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
दरम्यान, शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुधवारी रात्री नवी दिल्लीत येथे सर्व खासदारांसाठी स्नेहभोजनचा कार्यक्रम ठेवला होता. या स्नेहभोजनला ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे उपस्थित होते. दुसरीकडे, मंगळवारी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यातही ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी उपस्थिती दर्शवली होती. या सर्व घडोमोडी पाहता शिवसेना शिंदे गटाकडून सुरू असलेले ऑपरेश टायगर यशस्वी होत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.