जळगाव मिरर । १ ऑक्टोबर २०२५
गेल्या दोन दिवसापूर्वी जामनेर तालुक्यात एका ठिकाणी चारचाकीत अवैध गॅस रिफिलिंग करीत असताना मोठा स्फोट झाल्यानंतर आता तालुक्यातील फत्तेपूर येथील सप्तश्रृंगीनगर भागात अवैध गॅस रिफिलिंग करून वाहनांमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा वापर केला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच त्याठिकाणी धाड टाकून ३ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामुळे अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सप्तश्रृंगी भागातील रहिवासी संजय संपत श्रावणे त्याच्या राहत्या घरासमोर इको चारचाकी (एमएच १९, डिव्ही- ६५५७) मध्ये मशीनच्या सहाय्याने घरगुती एलपीजी सिलिंडरमधून अवैधरित्या गॅस भरत असल्याची गुप्त माहिती फत्तेपूरचे प्रभारी अधिकारी अंकुश जाधव यांना मिळाली. त्यांनी तत्काळ तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक नारायण सुर्वे हे घटनास्थळी दाखल झाले.
दोन पंचांच्या उपस्थितीत तपासणी करून भारत गॅस कंपनीचे ६ सिलिंडर, १ चारचाकी व गॅस भरण्यासाठी लागणारे यंत्र असा एकूण ३ लाख २२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संजय संपत श्रावणे (रा. फत्तेपूर) व गाडी मालक दीपक रतन वावरे (रा. लोणी) या दोघांविरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई स.पो.नि. अंकुश जाधव, पुरवठा निरीक्षक नारायण सुर्वे, पो.कॉ. विनोद पाटील, दीपक तेली यांनी केली