जळगाव मिरर | १ नोव्हेबर २०२३
‘ महिला सक्षमीकरण,महिला सर्वांगीण विकास,त्यांच्यासाठी रोजगाराच्या आणि प्रशिक्षणाच्या विविध संधी याबद्दलची चर्चा खूप वाढली आहे शासन आणि स्वयंसेवी संस्था अर्थसंस्था या विषयी विविध उपक्रम राबवतात मात्र अर्थव्यवहारात मुळातच महिलांचा वाटा खूप कमी आहे. आणि अनेक अडचणींचा सामना करत प्रयत्नपूर्वक त्या अर्थाजन करू लागल्या तरी त्यांनी कष्टाने मिळवलेल्या पैशांचे व्यवस्थापन,विनियोग त्यांच्याशिवाय इतरच कोणीतरी करत. त्यामुळे महिलांनी कमावलेले पैसे असुरक्षित होतात, आणि तिचे हात रिकामेच राहतात. म्हणून आत्मनिर्भर होण्याचा आणि राहण्याचा एक भाग म्हणून महिलांनी पैशाचे व्यवस्थापन आणि सुरक्षा कशी करावी हे शिकलं पाहिजे.’ असा सल्ला ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि उद्योजिका वासंती दिघे यांनी महिलांना दिला.युनिक एज्युकेशनल फाउंडेशन आणि कॉसमॉस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला बचत गट मोफत व्यवसाय प्रशिक्षण वर्गांचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम आज येथे त्यांच्या हस्ते झाला. त्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार,कॉसमॉसच्या अर्थसमावेशन प्रकल्प व्यवस्थापक स्मिता निरगुडे, युनिकच्या संस्थापक अध्यक्ष सुरेखा माने, युनिक चे समन्वयक आणि कॉसमॉसच्या अर्थ समावेशन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदवला होता.
श्रीमती दिघे पुढे म्हणाल्या, ‘ देशामध्ये लोकशाहीच्या सार्वत्रिकीकरणासाठी नुकतेच संसदेमध्ये कायदेमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण देणारा कायदा करण्यात आला. या कायद्याचा अंमल सुरू होईल तेव्हा कायदेमंडळात 33 टक्के महिला असतील. पण केवळ तेवढ्याने समतेच्या दिशेची वाटचाल यशस्वी होणार नाही. तर स्थानिक पातळीवर महिलांना जीवनाच्या सर्व व्यवहारात समतापूर्ण सहभागी केले पाहिजे. अर्थव्यवहार हा या सर्व प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणून अर्थव्यवहारात निर्णय प्रक्रियेत महिलांना स्थान असले पाहिजे. त्यासाठी युनिक आणि कॉसमॉस यांचे महिलांसाठीचे आर्थिक समावेशन प्रकल्प महत्त्वाचे ठरतात. या प्रकल्पा अंतर्गत युनिक संस्थेच्या माध्यमातून जळगाव शहर आणि जिल्ह्यामध्ये सुमारे 500महिला बचत गट कार्यरत आहेत. त्यामार्फत साधारणतः 6000 महिला अर्थसाक्षरता आणि व्यवहाराचे धडे गिरवतात. यातील 500 च्या वर महिलांनी आपले उद्योग सुरू केले आहेत. नुकत्याच झालेल्या नवरात्र आणि दसरा आणि येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 200 महिलांना मायक्रम, ब्युटी पार्लर, हर्बल कॉस्मेटिक या विषयांवर उद्योग व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामध्ये 15 बचत गटांनी सहभाग घेतला होता. गटामार्फत या महिलांना अर्थसहाय्य करण्यात येणार असून त्याकरता प्रत्येक गटाला तीन लाख ते पाच लाख इतके अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सुरेखा माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्मिता निरगुडे यांनी बँकेची भूमिका मांडली. पवार यांनी स्त्री पुरुष समतेसाठी अर्थ समावेशन याविषयी गटांना मार्गदर्शन केले. रंजना गरुड यांनी आभार मानले तर या आधीच्या टप्प्यात व्यवसाय प्रशिक्षण घेऊन स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरू करणाऱ्या मनीषा बाबर, पूर्वा पाटील, नेहा पाटील,सुकन्या भावसार या जळगाव मधिल नवउद्योजकांनी आपली यशोगाथा सर्वांना सांगितली.