जळगाव मिरर | ३० ऑक्टोबर २०२५
मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था हि संघटना मानवी हक्कांच्या जनजागृतीसाठी तसेच अन्याय, अत्याचारित व पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून सतत कार्यरत असलेली सामाजिक संस्था आहे. संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील दुर्बल घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि त्यांच्या न्याय व अधिकारांसाठी संघर्ष करणे हा आहे.
या सामाजिक उद्दिष्टांच्या कार्यात अधिक प्रभावी नेतृत्व निर्माण करण्याच्या दृष्टीने जळगाव जिल्हा कमिटीच्या अध्यक्षपदी श्री. अमोल अशोक कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे. अमोल कोल्हे माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष व छावा मराठ युवा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हे पद भूषवित आहेत. तसेच ते गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय, पत्रकारिता व माहिती अधिकार क्षेत्रात कार्यरत आहेत.
या निवडीचे पत्र मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेचे अध्यक्ष श्री. विकास कुचेकर यांच्या सहीने देण्यात आले असून, श्री. कोल्हे यांच्याकडून संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध मानवी हक्क विषयांवर सक्रिय जनजागृती, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे आणि सामाजिक परिवर्तनासाठी लढा देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
संस्थेचे राज्यभरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी नव्या जिल्हाध्यक्षांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कार्य अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

 
			


















