जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२४
कामावरून घरी परतत असताना रस्ता ओलांडणाऱ्या सदू ओंकार चव्हाण (वय ६५, मूळ रा. आंबेवडगाव, ता. पाचोरा, ह. मु. नेहरू नगर) या वृद्धाला भरधाव बसने चिरडले. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शिरसोली रस्त्यावरील कृष्णा लॉन समोर घडली. पोलिसांनी बस सह चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील सदू चव्हाण हे वृद्ध नेहरू नगर येथे कुटुंबियांसह राहत होते. मेहरुण तलाव परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले. रस्ता ओलांडत असतांना जळगाव आगाराची (एमएच २०, बीएल ११९७) क्रमांकाची बस पाचोऱ्याकडे जात होती. यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने रस्ता ओलांडणाऱ्या सदू चव्हाण या वृद्धाला जोरदार धडक दिली. या अपघातात सदू चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
काही वेळाने त्याठिकाणी चव्हाण यांचा मुलगा आला असता, त्याला अपघातात ठार झालेले आपले वडील असल्याचे समजले. यावेळी वडीलांचा मृतदेह बघताच त्याने आक्रोश केला. पोलिसांनी घटनास्थळाहून धडक देणारी बस सह चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचारी किशोर पाटील, नाना तायडे, किरण पाटील, नितीन ठाकूर, योगेश बारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. स्नेहल दुग्गड यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. मयत चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार होय.