प्रभाग १८ मधील सांडपाणी थेट रस्त्यावर; आरोग्यधोक्याचा प्रश्न ऐरणीवर
जळगाव मिरर | २४ फेब्रुवारी २०२६
प्रभाग क्रमांक १८ मधील पोलीस कॉलनी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सांडपाणी निचऱ्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रश्नावर तातडीने गटारीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे करण्यात आली असून, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पोलीस कॉलनी परिसरात सुमारे पंधरा वर्षांपासून सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य, पर्यावरणीय संतुलन आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गंभीर परिणाम होत आहे.
निवेदनात भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ चा उल्लेख करत प्रत्येक नागरिकाला सन्मानपूर्वक आणि आरोग्यदायी वातावरणात जगण्याचा अधिकार असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापनाची वैधानिक जबाबदारी असूनही ती पार पाडली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गटार व्यवस्था नसल्यामुळे परिसरात साचलेल्या पाण्यातून डासांची उत्पत्ती वाढत असून मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. नागरिक नियमितपणे महानगरपालिकेचे कर भरत असतानाही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मनसेने प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत: संबंधित परिसराची तात्काळ पाहणी करावी. गटारीच्या नवीन बांधकामास प्रशासकीय मान्यता देऊन नियोजित कालमर्यादेत काम पूर्ण करावे. कामाच्या प्रगतीबाबत नागरिकांना लेखी माहिती द्यावी. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास नागरिकांच्या आरोग्य आणि हक्कांच्या रक्षणासाठी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, शहराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, चेतन पवार तसेच विभाग अध्यक्ष व शाखाध्यक्षांसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. दरम्यान, या निवेदनावर महानगरपालिकेची भूमिका काय असणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




















