जळगाव मिरर | ४ नोव्हेंबर २०२५
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रतिक्षा अखेर संपली आहे. निवडणूक आयोगाने आज मंगळवारी झालेल्या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेत नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेत मात्र राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आयोगाने फक्त नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींसाठी मतदान 2 डिसेंबर रोजी होणार असून, निकाल 3 डिसेंबरला घोषित केले जाणार आहेत.
या निवडणुकीतून एकूण 6,859 नगरसेवक आणि 288 नगराध्यक्षांची निवड होणार आहे. निवडणुकीस पात्र असलेल्या नगरपरिषदांपैकी 10 नवीन नगरपरिषदा आणि 15 नवीन नगरपंचायतींचा यात समावेश आहे. तर अजून 105 नगरपंचायतींची मुदत संपलेली नाही.
विभागनिहाय निवडणुकीचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे:
-
कोकण विभाग : 17
-
नाशिक विभाग : 49
-
पुणे विभाग : 60
-
संभाजीनगर विभाग : 52
-
अमरावती विभाग : 45
-
नागपूर विभाग : 55
निवडणुकीच्या या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.



















