जळगाव मिरर | २० जून २०२४
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जी विजयाची सूज आली आहे, त्या सुजेवर आता हिंदुत्वाचा झंडू बाम लावण्याची वेळ आली आहे. त्यासाठी शिवसेना पक्षसंघटना मजबूत करून विरोधकांना चारीमुंड्या चीत करा आणि आगामी निवडणुकीत विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी ‘ग्रामसभा ते विधानसभा’ हा नारा देत जिंकण्याचा निर्धार करा, असे आवाहन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच काँग्रेसच्या दावणीला बांधलेल्या शिवसेनेला सोडवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी केलेला उठाव योग्य होता, यावर राज्यातील जनतेने आता शिक्कामोर्तब केले असून लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने घासून पुसून नव्हे तर ठासून विजय मिळवला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
बुधवारी शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त वरळीतील एनएसआय डोम येथे आयोजित मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर, रामदास कदम, आनंदराव अडसूळ, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोहे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री शंभूराज देसाई, उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड, गुलाबराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, संदीपान भुमरे, रवींद्र वायकर, माजी खासदार भावना गवळी, राहुल शेवाळे यांच्यासह प्रमुख नेते, आमदार, पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















