जळगाव मिरर | ३ जुलै २०२५
तालुक्यातील कंडारी येथे बचत गटाच्या पैशांबाबत विचारणा केल्याचा कारणावरुन नंदकिशोर नारायण सोनवणे (वय ५१) यांच्यासह त्यांची पत्नी व लहान भावाच्या बायकोला चार जणांनी मारहाण केली. ही घटना दि. १० जून रोजी कंडारी गावात घडली होती. याप्रकरणी चौघांविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील कंडारी गावात नंदकिशोर नारायण सोनवणे हे वास्तव्यास असून त्यांचा मासेविक्रीचा व्यवसाय आहे. दि. १० जून रोजी सायंकाळच्या सुमारास बचत गटाच्या सचिव अनुराधा शत्रुध्न वाणी यांनी तुम्ही इतर बचत गटाच्या महिलांनी तुमच्याकडे पैसे जमा केले. ते पैसे वेळेवर बँकेत भरणा करत जा असे म्हणाले. त्याचा राग आल्याने शत्रुघ्न अशोक वाणी, शोभाबाई अशोक वाणी, अनुराधा शत्रुघ्न वाणी, कविता भरत वाणी यांनी नंदकिशोर सोनवणे यांच्यासह त्यांची पत्नी व लहान भावाची बायको यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत जखमी केले.
तसेच भांणात समोरील गटाने सोनवणे यांना ढकलून दिल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर नशिराबाद पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक रविंद्र तायडे हे करीत आहे.
