जळगाव मिरर | २७ ऑगस्ट २०२५
राज्यभरात आज गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी भक्तीमय वातावरण असताना, रोजलँड इंग्लिश मीडियम शाळेत दीड दिवसीय गणपती बाप्पाची स्थापना मोठ्या उत्साहात पार पडली. शाळेतील पालकांच्या हस्ते गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना सोले मॅडम व इंग्रजी माध्यमाच्या सौ. सीता तिवारी मॅडम, विद्यार्थी, शिक्षकवृंद, तसेच शाळेतील सर्व कर्मचारी वर्ग उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना सोले मॅडम यांच्या हस्ते गणपती बाप्पाची करण्यात आली.
स्थापना सोहळ्यानंतर शाळेच्या संस्थापिका अध्यक्ष महोदय सौ. रोजमीन खिमानी प्रधान यांनी पालक व उपस्थित समाजबांधवांना संबोधित केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. टिळकांनी हा उत्सव फक्त धार्मिक सोहळा न ठेवता समाजाला एकत्र आणण्यासाठी, एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी आणि स्वातंत्र्यसंग्रामाला बळ देण्यासाठी सुरू केल्याची आठवण त्यांनी करून दिली.
त्यांनी असेही सांगितले की, गणेशोत्सव हा आजच्या काळात समाजातील एकात्मता, बंधुभाव, सांस्कृतिक जाणीवा आणि सामाजिक सलोखा जपण्याचे मोठे कार्य करत आहे. गणपती बाप्पा हे ‘ज्ञानाचे दैवत’ असून शाळेत गणेशस्थापना केल्याने विद्यार्थ्यांमध्ये विद्या, बुद्धी आणि संस्कारांची प्रेरणा जागृत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना शाळा समाजासाठी केवळ शिक्षणपुरतेच नव्हे, तर संस्कारांचे केंद्र ठरते, असे नमूद केले. या गणेशस्थापनेमुळे शाळेच्या परिसरात भक्तिमय, आनंदमय आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.
यावेळी शाळेच्या इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. सीता तिवारी मॅडम यांनी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना विसर्जन सोहळ्यास दिनांक 28.08.2025 रोजी सहभागी होण्यासाठी सादर आमंत्रण दिले.