जळगाव मिरर | संदीप महाले
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत जनतेने महायुतीच्या हाती पुन्हा एकदा स्पष्ट कौल दिल्यानंतर महापौरपदावर कोण विराजमान होणार, याकडे शहराचे लक्ष लागले होते. मात्र महापौरपदाचे आरक्षण जाहीर होताच अनेक इच्छुकांचे स्वप्न क्षणात भंगले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विविध पक्षांतील नेते आणि नगरसेवकांकडून महापौरपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू होते. काही इच्छुकांनी तर थेट महापौरपदाचे स्वप्न उराशी बाळगले होते. मात्र आरक्षणाची घोषणा होताच या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
यंदा देखील जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी ओबीसी महिला हे आरक्षण निश्चित झाल्याने अनेक दिग्गजांच्या महत्त्वाकांक्षांना ब्रेक लागला आहे. आरक्षणामुळे महायुतीसमोरील पर्याय मर्यादित झाले असून आता ओबीसी महिला नगरसेविकांमधून महापौर निवडीची प्रक्रिया वेगाने हालचाली घेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असल्याने महापौरपदावर कोण विराजमान होणार यावर अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, महापौरपदाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक इच्छुकांमध्ये निराशा पसरली असून राजकीय गणिते पुन्हा नव्याने मांडली जात आहेत. महापौर आरक्षणाच्या घोषणेमुळे जळगावच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली असून आगामी काही दिवसांत महापौरपदासाठीची नावं जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




















