जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२४
नवी दिल्ली येथील विमानतळावर इंडिगोच्या विमानाला उशीर झाल्याने एका प्रवाशाने वैमानिकावर हल्ला केला. हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी सायंकाळी इंडिगोच्या विमानात घडलेल्या या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इंडिगो एअरलाइन्सचे दिल्ली गोवा विमान रविवारी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास उड्डाण करणे अपेक्षित होते; परंतु धुक्यामुळे विमानाचे उड्डाण लांबले. विमानाचे उड्डाण लांबल्यामुळे कर्मचारीदेखील बदलावे लागले यामुळे उड्डाणाला अजूनच विलंब झाला. या विलंबाबद्दल वैमानिक माहिती देण्यासाठी आलेला असताना एक प्रवासी त्याच्या अंगावर धावून गेला. साहिल कटारिया, असे या प्रवाशाचे नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये साहिल वैमानिकाला चापट मारताना दिसत आहे. एकतर विमान उडव नाही तर आम्हाला खाली उतरव, असे साहिल ओरडतो. वैमानिकावर हल्ला करणाऱ्या प्रवाशावर विमानातील चालक दलाचे इतर सदस्य ओरडत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
आणखी एका व्हिडीओत सुरक्षा कर्मचारी कटारियाला विमानाबाहेर घेऊन जात असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर ताळ्यावर आलेला हा प्रवासी वैमानिकावर हल्ल्यासाठी माफी मागताना व्हिडीओत दिसते. या हल्लेखोर प्रवाशाचा ‘नो-फ्लाई लिस्ट’ (विमान प्रवासाला बंदी) मध्ये समावेश करण्यासाठी संबंधित प्रकरण स्वतंत्र अंतर्गत समितीकडे सुपुर्द केल्याची माहिती एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याने दिली. अखेर या सर्व गदारोळानंतर सकाळचे हे विमान संध्याकाळी सहा वाजेच्या या सुमारास गोव्याच्या दिशेने रवाना झाले.