जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२५
राज्यात नगरपरिषद तसेच नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली आहे. तर काही ठिकाणी EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांचा खोळंबा झाला आहे.
याच दरम्यान हिंगोली जिल्ह्यातही मतदानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप समोर आला आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत बांगर यांना फटकारले आहे.
हिंगोलीतील कळमनुरी येथे मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक 3 वर सकाळी संतोष बांगर मतदानासाठी पोहोचले. मात्र मतदान केंद्रात जाताच त्यांनी “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं”, अशी घोषणाबाजी केली. याचदरम्यान त्यांनी मोबाइल फोनचा वापरही केला.
इतकेच काय तर, त्यांनी महिला मतदाराला प्रत्यक्ष ईव्हीएम बटण दाबताना मार्गदर्शन केले. मतदान केंद्रात घोषणाबाजी, मोबाईल वापरणे किंवा मतदाराला कोणताही निर्देश देणे हे निवडणूक गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन मानले जाते. त्यामुळे या प्रकरणावर संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष बांगर यांना खडेबोल सुनावले आहेत. “किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची जाण ठेवली पाहिजे. निवडणुकीत आपण कसं वागतोय, आपण कोणता संदेश देतोय याचा विचार केला पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, संतोष बांगर यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.





















