जळगाव मिरर | २६ जानेवारी २०२६
नाशिक येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात मोठा वाद निर्माण झाला. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख न केल्याने संतप्त झालेल्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याने थेट व्यासपीठाजवळच त्यांना जाब विचारला. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली असून, संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. भारताने २६ जानेवारी १९५० रोजी संविधान स्वीकारले असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे शिल्पकार मानले जातात. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्यांच्या योगदानाचा उल्लेख होणे अपेक्षित असतानाही महाजन यांनी संपूर्ण भाषणात बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने वादाला तोंड फुटले.
वन विभागात कार्यरत असलेल्या महिला पोलिस अधिकारी माधवी जाधव यांनी मंत्री महाजन यांना, “बाबासाहेबांचे नाव भाषणात का घेतले नाही?” असा थेट सवाल केला. या अनपेक्षित प्रकारामुळे पालकमंत्री महाजन काही काळ भांबावले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, “मला निलंबित केले तरी चालेल, पण मी बाबासाहेबांच्या नामोल्लेखासाठी विचारलेला जाब मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.
यानंतर पत्रकारांशी बोलताना माधवी जाधव म्हणाल्या की, संविधानामुळेच आज आपण सर्वजण या पदांवर आहोत. ज्यांनी संविधान घडवले त्या बाबासाहेबांचे नाव जाणीवपूर्वक टाळले गेले, ही फार मोठी चूक आहे. संविधानाशी थेट संबंध नसलेल्या व्यक्तींची नावे भाषणात घेतली जातात, मग प्रजासत्ताक दिनाचा खरा मानकरी असलेल्या बाबासाहेबांचे नाव का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण घटनेमुळे नाशिकमधील शासकीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला वादाचे गालबोट लागले असून, सामाजिक व राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.





















