हरिजन कन्या छात्रालयात नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे कार्यशाळेचे आयोजन
जळगाव मिरर | ५ सप्टेंबर २०२६

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हरिजन कन्या छात्रालयात नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यशाळेत कला शिक्षक सुनील दाभाडे यांनी विद्यार्थिनींना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले.
शाडू माती व नैसर्गिक साहित्याचा वापर करून गणेशमूर्ती तयार करण्याची पद्धत, मूर्तीला आकर्षक आकार देण्याचे तंत्र तसेच गणेशोत्सवानंतर मूर्तीचे विसर्जन करताना पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती तयार करण्याचा अनुभव घेतला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींमध्ये सर्जनशीलता, कलाकौशल्य आणि पर्यावरणाप्रती जबाबदारीची भावना विकसित होण्यास मदत झाली. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर केल्यास जलप्रदूषण आणि पर्यावरणाची हानी टाळता येते, असा संदेशही यावेळी देण्यात आला.
कार्यशाळेच्या आयोजनासाठी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष मनीषा पाटील, हर्षा गुजराती, स्मिता पाटील पर्यावरण शिक्षक प्रविण पाटील तेजल वनरा शरयु पाटील तसेच वस्तीगृहाच्या अधिक्षका प्रतिभा मोगरे उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थिनींच्या कलाकृतींचे कौतुक करून पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थिनींनी उत्साहाने गणेशमूर्ती तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. पारंपरिक श्रद्धेसोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याची गरज या उपक्रमातून अधोरेखित झाली. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजन केले




















