
जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२५
मागील आठवड्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तान विरूद्ध विविध स्तरांवर कारवाई सुरू आहेत. अशातच आता भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून १६ पाकिस्तानी युट्युब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यात पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तर,आरजू काजमी आणि सय्यद मजम्मिल शाह यांच्या चॅनेल्सचाही समावेश आहे. या सर्व चॅनेल्सचे एकत्रितपणे ६३ दशलक्षांहून अधिक सबस्क्रायबर्स् आहेत.
२२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर निशस्त्र पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.या हल्ल्यामागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा हात असून, केंद्र सरकारकडून पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर आता भारताने पाकिस्तानी युट्युब चॅनेल्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या चॅनेल्सवर जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर भारत, भारताचे सैन्य आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध प्रक्षोभक आणि संवेदनशील माहिती खोटी व दिशाभूल करणार्या स्वरूपात पसरवल्याचा दावा करण्यात आला आहे.
बंदी घातलेल्या यूट्यूब चॅनेलच्या यादीत डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज आणि जिओ न्यूज यासारख्या प्रमुख चॅनेलचा समावेश आहे. तसेच इरशा भट्टी, रफ्तार, द पाकिस्तान रेफरन्स, समा स्पोर्ट्स, जीएनएन, उजैर क्रिकेट, उमर चीमा एक्सक्लुझिव्ह, आस्मा सिराजी, मुजीब फारूख, सुनो न्यूज आणि रझी नामा ही इतर यूट्यूब चॅनेल आहेत.
याव्यतिरिक्त, परिस्थितीचे चुकीचे वर्णन करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टवर कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनुसार, पहलगाम घटनेच्या चित्रणाबद्दल, विशेषतः त्यांच्या वृत्तांकनात दहशतवाद्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दावलीबद्दल चिंता व्यक्त झाल्यानंतर बीबीसीकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, यूट्यूबवर हे चॅनेल्स सर्च केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा आणि वा सार्वजनिक व्यवस्थेशी संबंधित केंद्र सरकारच्या आदेशानुसार हे चॅनेल्स सद्यस्थितीत या देशात उपलब्ध नाही. सरकारच्या बंदीशी संबंधित अधिक माहितीसाठी गुगल पारदर्शक रिपोर्टवर जा असा मेसेज दाखवत आहे.