जळगाव मिरर | २५ जुलै २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असतांना नुकतेच पुण्यात पावसाचा हाहाकार सुरु झाला असून भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खालील अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्यात गेलेल्या तिघांचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. अभिषेक घाणेकर, आकाश माने आणि शिवा परिहार अशी मृतांची नावे आहेत.
पुण्यात जोरदार पाऊस सुरु असून जिल्ह्याला हवामान खात्याने आज रेड अलर्ट जाहीर केला आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी पाणीच-पाणी झाले आहे. आज (दि.२५) पहाटे तीन वाजताच्या सुमारास भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खाली पाणी पातळी वाढली. पाणी पातळी वाढल्याने तेथील अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी तिघेजण गेले. सुरक्षित ठिकाणी हलवताना अचानक विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू झाला. या तिघांपैकी अभिषेक अजय घाणेकर (वय वर्ष २५) आणि आकाश विनायक माने (वय वर्ष २१) दोघे पुलाच्या वाडी डेक्कन येथिल रहिवासी असुन शिवा जिदबहादुर परिहार (वय १८) नेपाळी कामगार आहे. शॉक लागल्यानंतर तिघांना नजीकच्या हॉस्पिटल येथे दाखल केले. उपचारांती डॉक्टरांनी मयत घोषित केले.