जळगाव मिरर / २४ फेब्रुवारी २०२३ ।
रावेर तालूक्यातील अहिरवाडी येथील बहिरमबाबा परिसरातील खळवाडीत योगेश व रामदास दगडू धनगर यांच्या मालकीच्या खळ्याला २२ फेब्रुवारी रोजी रात्री लागलेल्या अकस्मात आगीत दावणीला बांधलेले एक बैल, दोन पारड्डू भस्मसात होऊन जागीच ठार झाल्याची तर एक गोन्हा आगीत होरपळून गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
या आगीच्या भक्ष्यस्थानी शेतकऱ्यांनी पोखरा योजनेंतर्गत शेतात पाइपलाइन करण्यासाठी खरेदी केलेले पीव्हीसी पाइप, कूपनलिकेचे फायबर केसिंग पाइप, मोटारपंप व गुरांचा चारा जळून भस्मसात झाला. याबाबत खानापूर महसूल मंडळाधिकारी विठोबा पाटील यांनी पंचनामा केला आहे.
या खळ्याला २२ फेब्रुवारीच्या रात्री आग लागून धुराच्या लोटांसह आगडोंब आकाशात उसळू लागताच आग विझवण्यासाठी सारा गाव हातात मिळेल ते पाण्याची साधने घेऊन घटनास्थळी दाखल झाला. या भीषण आगीने रौद्र रूप धारण केल्याने त्यात दावणीला बांधून ठेवलेले एक बैल व म्हशीचे दोन मोठे पारडू आगीच्या भक्ष्यस्थानी ठार झाले. तर एक गोन्हा भाजल्याने जखमी झाला. काही युवकांनी या आगीत उडी घेऊन एक बैलजोडी सोडून त्यांचे प्राण वाचवले. या भीषण आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. रावेर न. पा. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. दरम्यान, पशुधन विकास अधिकारी डॉ. अभिजित डावरे यांनी जनावरांवर रात्री तातडीने औषधोपचार केले.