
जळगाव मिरर | ३० जुलै २०२३
गेल्या काही दिवसापासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे हे बेताल विधान करून राजकारणात खळबळ उडवून टाकत आहे. गेल्या चार दिवसापासून ते सातत्याने वादग्रस्त विधान करीत आहे. त्यांच्यावर विदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसने राज्यभर आंदोलने केल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यावर सुध्दा त्यांनी नुकतेच महात्मा ज्योतिबा फुले व साईबाबा, राजा राममोहन रॉय यांच्यावर खालच्या भाषेत टिका केल्याने पुन्हा वाद विकोपाला आला आहे.
अमरावतीत होत असलेल्या व्याख्यानमालेत भिडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले, राजाराम मोहन रॉय, साईबाबा यांच्यावर टिका करीत असतांना शिव्या आणि जातीय तेढ निर्माण करणारे विधान केल्याने पुन्हा एकदा त्यांच्यावर राज्यातील जनतेतून संताप व्यक्त होवू लागली आहे. भिडे आपल्या भाषणात म्हणाले की, भारतीयांनी राज्य कसे मिळवायचे हे शिकविण्यासाठी इंग्रजांनी देशात सुधारक नावाची जात पैका केली असून काही निवडक लोकांना समाजसुधारकांचा दर्जा दिला आहे. तर उत्तर प्रदेशात भारतप्रसाद मिश्रा, राजा राममोहन रॉय, रामास्वामी नायकर व महात्मा फुले याचा उल्लेख देखील त्यांनी केला. या सर्वांवर देशद्रोहाचे शिक्के असून माझ्याकडे याचे सर्व पुरावे उपलब्ध असल्याचा देखील दावा त्यांनी यावेळी केला आहे. तर हिंदूनी आपल्या घरातील देव्हाऱ्यातून साईबाबाला काढून फेका लक्षात ठेवा मी काय बोलतोय मी काही डोके सटकलेला माणूस नाही, मी जे बोलतोय ते जबाबदारीने बोलते असे देखील त्यांनी यावेळी ठणाकावून सांगितले.





















