जळगाव मिरर | ९ सप्टेंबर २०२४
राज्याच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोप सुरु असतांना दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे, प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी एकत्र येत तिसरी आघाडी निर्माण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांनी ओला दुष्काळ पाहणी दौरा सुरू केला आहे.
राज्यातील परभणी येथील ओला दुष्काळाची पाहणी बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांनी केली. परभणी येथील मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील शेतकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधत त्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी या तिघांनी एकत्रित केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर या तिघांनी एकत्रित येत येथील समस्या तसेच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हा दौरा सुरू केला आहे.
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर बच्चू कडू यांनी सरकारने त्वरित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. उद्योगांप्रमाणे शेतीलाही विमा हवा, असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले. अशा प्रकारची अतिवृष्टी होणे हे नेहमी होते आणि नेहमीच शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होतात. म्हणून आम्ही सरकारला कायमचा उपाय सांगत आहोत की, पेरणी पासून ते कापनीपर्यंत सगळा खर्च योजनेमध्ये बसवला पाहिजे. मजूरीचा खर्च जर योजनेमध्ये बसला तर गावात मजूर पण स्थिर होईल आणि शेतकरी पण स्थिर होईल. यामुळे नुकसान पण कमी होईल, असे बच्चू कडू यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, आता आपण बघतो की शेतकऱ्यांचे नुकसान झाले की त्याचे पंचनामे होतात आणि तीन महिन्यानंतर त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळतात. असे न करता नुकसान भरपाई लगेच मिळाली तर बरे होईल. जसे उद्योगांना विमा असतो, तसा शेतीला तुम्ही का देत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.