जळगाव मिरर | १५ फेब्रुवारी २०२६
पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले पाहिजे, असा वादग्रस्त विधान केल्यानंतर पुण्यातील रस्त्यावर आज दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष उभा राहिला.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी या विधानाचा निषेध करण्यासाठी पुणे काँग्रेस भवन समोर मोर्चा काढला. मात्र आंदोलनाला हिंसक वळण लागले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले, ज्यात जोरदार घोषणाबाजी, दगडफेक आणि बाटल्या फेकल्या गेल्या. या संघर्षात काही काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाले असून परिसरातील काही वाहनांच्या काचा फुटल्या आहेत.
आंदोलनादरम्यान भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी अचानक दगडफेक सुरू केली, ज्यात एका काँग्रेस कार्यकर्त्याला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनीही परिसरात उभ्या गाड्यांवर दगडफेक केली. यावेळी त्यांनी भाजपवर आणि पोलिस प्रशासनावर संताप व्यक्त करत आरोप केला की, “तुम्ही कार्यकर्त्यांना दगड मारताय, तुम्हाला लाज वाटली पाहिजे.”
घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन लाठीचार्जची तयारी दाखवली आणि दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाने सांगितले की, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून दोन्ही पक्षांवरील तणावपूर्ण वातावरण आता नियंत्रणात आहे आणि काँग्रेस भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.





















