
जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२५
राज्यातील बीड जिल्हा पुन्हा एकदा गुन्हेगारीने चर्चेत आला आहे. कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारी आणखी एक घटना घडली आहे. बीडच्या माजलगाव येथे येथे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याची भरदुपारी धारदार कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, यामुळे पंचक्रोशीत एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आगे असे हत्या झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव ग्राम पंचायतीचे सदस्य होते. ते भाजपचे विस्तारक म्हणून काम करत होते. मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास ते भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळील भाजप कार्यालयात आले होते. त्यावेळी भाजप कार्यालयापुढेच कोयत्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर बराच वेळ त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडून होता. त्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
आबासाहेब आगे यांच्या हत्येनंतर आरोपी नारायण शंकर फपाळ याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. तो हत्येनंतर चालत माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गेला. तिथे त्याने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. आरोपीने बाबासाहेब आगे यांची का हत्या केली? याचा तपास पोलिस करत आहेत. पण हे हत्याकांड पैशांच्या देवाणघेवाणीतून घडले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आरोपी नारायण फपाळने कोयता आपल्या शर्टच्या पाठीमागे लपवून आणला होता. आगे यांच्या जवळ पोहोताच त्याने तो बाहेर काढून त्यांच्यावर सपासप वार केले. त्यात आगे यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजली.