जळगाव मिरर | 1 नोव्हेंबर 2025
राज्याच्या राजकारणात आजचा दिवस खूप महत्वाचा मानला जात आहे. आज १ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता मुंबईत मतदार याद्यांमधील घोळ तसेच आदी मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘सत्याचा मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात महाविकास आघाडीतील पक्ष देखील सहभागी होणार असल्याने कोण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मोर्चा स्थळी पोहचण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई लोकलचा प्रवास केला. राज-उद्धव ठाकरे दोघेही या मोर्चातून एकत्र चालणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर राज ठाकरे यांच्या शिलेदाराने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मनसे – महाविकास आघाडीच्या आजच्या सत्याच्या मोर्चाला प्रतिउत्तर म्हणून भाजपाने मूक आंदोलन न करता स्वतःच्या “थोबाडीत मारा आंदोलन” केले पाहिजे, असे मनसेचे गजानन काळे यांनी म्हटले आहे. यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला भाजप काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणे महत्वाचे असणार आहे.
पण हा मोर्चा ठाकरे बंधूंला जास्त अधोरिखत करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. या मोर्चात आघाडीतील शरद पवारांसह उद्धव ठाकरे, राज ठाकरे, विजय वडेट्टीवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आदी महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. अनेकांची भाषणे देखील होणार आहेत. त्यामुळे कोण काय बोलणार याकडे महाराष्ट्रातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.



















