जळगाव मिरर | संदीप महाले
स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी जळगाव शहरात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का भाजपने देत दोन माजी महापौरांसह अनेक नगरसेवक व कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश करून घेतला आहे. मात्र यामुळे ज्यांच्या विरोधात भाजपने मतदान मागितलं त्यांनाच पक्षात घेतल्याने भाजप एकनिष्ठासह जळगावकर मतदार राजा नाराज झाल्याची चर्चा जळगाव शहरात जोरदार सुरू झाली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नेत्यांचे निवडणूक असते म्हणून प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता एकनिष्ठ पद्धतीने आपल्या पक्षाचा प्रचार प्रसार करून आपल्या विरोधी पक्षातील मित्रांशी वैर घेऊन हमरी तुमरी करून पक्षातच इमाने ईतबारे काम करीत असतो. मात्र ज्यावेळेस कार्यकर्त्याची निवडणूक येते जिल्हा परिषद असो की महानगरपालिका असो यावेळेस मात्र सर्वच पक्षातील नेते एकत्र येऊन कार्यकर्त्यांना नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सतरंजी उचलण्याचा कार्यक्रम देत असतात व विरोधातील नेत्यांना उमेदवारी देऊन पक्षाचा एकनिष्ठ पणा दाखविला जात असतो अशीच काही घटना जळगाव शहराच्या राजकारणात घडली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांच्या विरोधात उमेदवारी केलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई सुनील महाजन यांनी एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करत जळगाव शहराचे राजकारण तापविले होते. मात्र आता कार्यकर्त्यांची निवडणूक येण्यापूर्वीच भाजपच्या नेत्यांनी चक्क ज्यांच्या विरोधात भाजपने मतदान मागितलं त्यांनाच पक्षात घेतले आहे. त्यामुळे भाजप एकनिष्ठ कार्यकर्त्यांसह जळगावकर मतदार राजा नाराज झाल्याची चर्चा सध्या जळगाव शहरातील प्रत्येक गल्लीबोळात जोरदार सुरू झाली आहे.

 
			

















