
जळगाव मिरर | २७ एप्रिल २०२६
वरणगाव (ता. भुसावळ) : वरणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात लग्नाच्या हळदी समारंभादरम्यान किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे गंभीर रूपांतर होऊन मारहाणीची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात कोयत्याने हल्ला करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
याबाबत आतिश सिद्धार्थ इंगळे (वय ३८, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वरणगाव) यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, दि. २५ रोजी रात्री सुमारे १० वाजता हळदी समारंभातील नाचगाण्याच्या कार्यक्रमात धक्का लागल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला.
या वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. आरोपी गौरव राहुल कोरोसीया, हर्षल राहुल कोरोसीया आणि रोशन माळी (सर्व रा. वरणगाव) यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गौरव कोरोसीया व रोशन माळी यांनी विटांनी मारहाण करून फिर्यादीस जखमी केले.
दरम्यान, हर्षल राहुल कोरोसीया याने घरातून कोयता आणून फिर्यादीच्या डोक्यावर वार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात आतिश इंगळे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर वरणगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून कोयता व विटा जप्त केल्या असून पुढील तपास सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष सपकाळ तपास करीत आहेत. या प्रकरणाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांकडून अधिक दक्षता घेतली जात आहे.





















