
जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२५
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी वाढत असताना आता गुन्हेगारीच्या सावटाखाली बीड शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. शहराच्या मध्यवर्ती व कायम गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स परिसरात गुरुवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये स्थानीय पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा, यश देवेंद्र ढाका (वय २२) याची चाकूने छातीत वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण बीड शहरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
सविस्तर वृत्त असे कि, यश हा अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता. महिनाभरापूर्वी त्याचा सूरज काटे या मित्रासोबत वाढदिवसाच्या कार्यक्रमात किरकोळ वाद झाला होता. या वादाचं रूपांतर वैरात झालं आणि गुरुवारी रात्री त्याचा भीषण शेवट झाला. रात्री साडेआठच्या सुमारास, माने कॉम्प्लेक्समध्ये दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद एवढा विकोपास गेला की सूरजने चाकू काढून यशच्या छातीत थेट दोन वार केले. यामध्ये यश गंभीर जखमी झाला. नागरिकांनी त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसराचा पंचनामा करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. प्राथमिक तपासात सूरज काटे याच्यावर संशय निश्चित झाला असून तो पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या हत्येमागे इतर कोणी आहे का, याची चौकशी सुरू आहे.
यश हा बीडमधील प्रसिद्ध पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा असल्याने या घटनेचा व्यापक परिणाम झाला आहे. पत्रकार समाजाने यावर तीव्र संताप व्यक्त केला असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी, लोकांच्या समोर अशी हत्या होणे हे प्रशासनासाठीही गंभीर इशारा मानला जात आहे.




















