
जळगाव मिरर | ४ जून २०२४
देशातील हिमाचल प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा आघाडी घेताना दिसत आहे. येथे चारही लोकसभा जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. मंडी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत 31 हजार मतांनी आघाडीवर आहे. कंगनाची थेट स्पर्धा काँग्रेस उमेदवार विक्रमादित सिंग यांच्यासोबत आहे. मंडी लोकसभा जागेवर एकूण 10 उमेदवारांमध्ये निवडणूक लढत आहे. कंगना व्यतिरिक्त आणखी एक महिला उमेदवार राखी गुप्ता अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे.
पहिल्या टप्प्यातील मतमोजणीनंतर कंगना रणौत 31 हजार मतांनी आघाडीवर आहे. कंगनाला 225654 मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंग यांना आतापर्यंत 194563 मते मिळाली आहेत. कंगनाला एकूण मतांपैकी 52 टक्के मते मिळाली. यातच हमीरपूर लोकसभा मतदारसंघातही भाजप उमेदवाराने मोठी आघाडी घेतली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर 72676 मतांनी आघाडीवर आहेत. ठाकूर यांना 59 टक्के मत मिळाले.
मतदानाच्या पहिल्या टप्प्यात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या राजीव भारद्वाज यांना 323324 मते मिळाली असून ते 119571 मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार आनंद शर्मा यांना आतापर्यंत 203753 मते मिळाली आहेत. शिमला लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुरेश कुमार कश्यप आघाडीवर आहेत. त्यांना 257359 मते मिळाली असून ते 38659 मतांनी पुढे आहेत. तर काँग्रेसचे विनोद सुलतानपुरी यांना 218700 मते मिळाली आहेत.






















