जळगाव मिरर | १२ नोव्हेंबर २०२५
महानगरी एक्सप्रेस या रेल्वेत ‘बॉम्ब’ असल्याचा संशयास्पद संदेश आढळल्याने भुसावळ रेल्वे स्थानकावर बुधवारी रात्री मोठी खळबळ उडाली. “पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआय जिंदाबाद, गाडीत बॉम्ब आहे” असा संदेश रेल्वेच्या एका डब्याच्या शौचालयात लिहिल्याचे आढळताच भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ही माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल (RPF), लोहमार्ग पोलीस (GRP) आणि स्थानिक पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. गाडी भुसावळ स्थानकावर पोहोचताच श्वानपथकाच्या मदतीने संपूर्ण रेल्वेची तपासणी करण्यात आली. प्रत्येक डब्याची सखोल झडती घेऊन प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना तात्पुरते सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक साहित्य आढळून आले नाही, असे रेल्वे सुरक्षा दलाने स्पष्ट केले. त्यामुळे प्रवाशांनी दिलासा घेतला असून महानगरी एक्सप्रेसला तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने सुरक्षा उपाय अधिक कडक केले आहेत. “अशा प्रकारे अफवा पसरवून भीती निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच, प्रवाशांना कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा संदेश आढळल्यास तत्काळ अधिकाऱ्यांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



















