जळगाव मिरर | १४ मार्च २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्यातील महायुती सरकारमधील काही नेत्यांसह मंत्री नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असून आज राज्यभर होळी सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, एकनाथ शिंदे अर्थात दादा आणि भाई यांना थेट राज्याचे मुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली आहे. काँग्रेससोबत या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हाला मुख्यमंत्री करू असा विश्वास त्यांनी दिला आहे.
अर्थातच होळी धुळवडीच्या निमित्ताने बुरा न मानो होली है…! अशीच ही त्यांची राजकीय धुळवड निमित्ताने माध्यमांशी बोलताना ही ऑफर असल्याने सत्तापक्षाने त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. उलट पुढील दहा-पंधरा वर्षे काँग्रेसला राज्यात संधीच नाही असा टोला भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोले यांना लगावला आहे. राज्याचा सर्व कारभार मुख्यमंत्री कार्यालयातूनच चालत असल्याने व मुख्यमंत्री आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांनी हा नवा आयाम दिला असल्यामुळे उपमुख्यमंत्री पदी असलेले एकनाथ शिंदे अजितदादा पवार हे तर त्रासले आहेत. या दोघांपैकी कोणीही जवळचा नाही हे त्यांना देखील आता माहीत झाले आहे.
यामुळेच आता अजित पवार एकनाथ शिंदे यांनी आमच्या सोबत यावे त्यांना आम्ही मुख्यमंत्री पदाची संधी देऊ काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे दोघांनाही निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे आम्ही हे संधी त्यांना देऊ असे माजी प्रदेशाध्यक्ष काँग्रेस नेते नाना पटोले यांनी स्पष्ट केले अर्थातच नाना पटोले यांच्या या ऑफरला सकारात्मक प्रतिसाद कोणीही दिला नसला तरी त्याची राजकीयदृष्ट्या चर्चा शुक्रवारी ऐन धुळवडीच्या दिवशी जोरात आहे.