जळगाव मिरर | ३० मार्च २०२५
ओडिशामध्ये पुन्हा एकदा मोठा रेल्वे अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे.याठिकाणी दिल्ली आणि आसाम दरम्यान धावणाऱ्या कामाख्या एक्सप्रेसचे ११ एसी डबे रुळावरून घसरले, त्यानंतर प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. चौधर परिसरातील मंगुली पॅसेंजर हॉल्टजवळ ट्रेन रुळावरून घसरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथके पाठवण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरू-कामाख्या सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन ओडिशाच्या चौधरजवळ रुळावरून घसरली. ट्रेनचे किमान ११ डबे रुळावरून घसरले आहेत. सकाळी ११.५४ वाजता ही दुर्घटना घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर अनेक प्रवासी जखमी झाल्याची भीती आहे.
ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ अशोक कुमार मिश्रा म्हणाले की, आम्हाला कामाख्या एक्सप्रेस (१५५५१) चे काही डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळाली आहे. ते म्हणाले, ‘आतापर्यंत आम्हाला ११ एसी कोच रुळावरून घसरल्याची माहिती मिळाली आहे. कोणीही जखमी झालेले नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. ” असे त्यांनी सांगितले.
पुढे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अपघातग्रस्त ट्रेनमध्ये मदत, आपत्कालीन वैद्यकीय उपकरणे पाठवण्यात आली आहेत. वरिष्ठ अधिकारी लवकरच घटनास्थळी पोहोचणार आहेत. डीआरएम खुर्दा रोड, जीएम/ईसीओआर आणि इतर उच्चस्तरीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. चौकशीनंतर आम्हाला रुळावरून घसरण्याचे कारण कळेल. आमची पहिली प्राथमिकता म्हणजे मार्गावर वाट पाहणाऱ्या गाड्या वळवणे आणि दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येत आहे. बी-६ ते बी-१४ पर्यंतचे डब्बे रुळावरून घसरले. परिणामी, अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. रेल्वेने माहिती दिली आहे की या मार्गावर धावणाऱ्या इतर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
