जळगाव मिरर | १३ जुलै २०२५
उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक हरल्यानंतर राज्यसभेत राष्ट्रपती कोट्यातून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उज्ज्वल निकम यांनी २०२४ लोकसभा निवडणूक लढवली होती. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रसेच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याविरोधात त्यांनी लढवलेली निवडणूक चुरशीची ठरली होती. अखेर वर्षा गायकवाड यांनी निसटती आघाडी घेत उज्ज्वल निकम यांचा पराभव केला होता.
भारताच्या राष्ट्रपतींनी संविधानाच्या कलम 80(1)(a) आणि त्याच कलम (3) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांनुसार, प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल देवराव निकम यांच्याबरोबरच केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते, भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांना नामांकित केले आहे. पूर्वी नामांकित सदस्यांच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेल्या रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर ही नामांकने आली आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाच्या कलम ८० (१) (अ) अन्वये त्यांना दिलेल्या अधिकारांचा वापर करत या चारही व्यक्तींना राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे. या कलमानुसार, राष्ट्रपती साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींना राज्यसभेवर सदस्य म्हणून नामनिर्देशित करू शकतात. या नामनिर्देशनांमुळे राज्यसभेला विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे. कायदा, आंतरराष्ट्रीय संबंध, इतिहास आणि समाजसेवा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवरील त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा देशाच्या धोरणनिर्मितीसाठी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या नियुक्त्यांमुळे संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील चर्चा आणि कामकाजाला एक नवी दिशा मिळण्यास मदत होईल.
उज्वल निकम यांचे मूळगाव जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील माचले गावचे आहेत. तेथेच त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले. जळगाव येथील एसएस मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या केसेस मध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पाहिले होते.
